बेळगाव : महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ४०० कोटींच्या जुन्या नोटांची वाहतूक करणारे दोन कंटेनर लुटल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ही चोरी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चोर्ला घाट (जि.बेळगाव) परिसरात घडल्याने कर्नाटकातही मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या कथित लुटीप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापण्यात आले आहे. या प्रकरणात पैसे लुटल्याच्या आरोपाखाली नाशिक येथील रिअल इस्टेट एजंट संदीप पाटील यांना अपहरण करून मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
त्यामुळे त्यांनी नाशिक पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर यातील ४०० कोटींच्या लुटीच्या घटनेचा उलगडा झाला आहे. रकमेचा संबंध नाशिक पोलिस दलातील काही कर्मचारी व ठाणे येथील नामांकित बिल्डर आणि एका राजकीय नेत्याशी असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. संदीप पाटील यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा तक्रारीत केला आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये कर्नाटकातील एका ठिकाणाहून दोन कंटेनरमध्ये भरलेले सुमारे ४०० कोटी रुपयांची रक्कम ही (रद्द झालेल्या दोन हजारांच्या नोटा) अहमदाबादमधील एका आश्रमाकडे पाठवण्यात आले होते. तेथे कमिशनच्या बदल्यात ही रक्कम कायदेशीर चलनात रूपांतरित करण्याचा कथित करार होता. मात्र, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी चोर्ला घाटात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दोन्ही कंटेनर अडवून त्यातील रक्कम लुटण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.
यानंतर अनोळखी व्यक्तींनी व्हॉइस-ओव्हर-इंटरनेट कॉलद्वारे बिल्डरशी संपर्क साधून, कंटेनर परत देण्यासाठी १०० कोटींची खंडणी (१००, २०० व ५०० रुपयांच्या नोटांमध्ये) मागितल्याचा आरोप आहे. यावेळी बिल्डराने चोरीत संदीप पाटील यांचा हात असल्याचा दावा केला. त्यातून पाटील याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पाटील यांना २२ ऑक्टोबर २०२५ रोजी घोटी (नाशिक) परिसरामधून आपले अपहरण करण्यात आले, त्यात पोलिस कर्मचारी व हवाला ऑपरेटरचे सहकारी सहभागी होते.
बंदुकीचा धाक दाखवून मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या आणि व्हिडिओ कॉलद्वारे बिल्डर व हवाला ऑपरेटरशी बोलण्यास भाग पाडल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यांना नंतर नाशिकमधील एका महामार्गावर सोडून देण्यात आले. यानंतर त्यांनी नाशिक पोलिसांत तक्रार नोंदवली.
डिजिटल पुरावे सादर
दरम्यान, पाटील यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे ऑडिओ, व्हिडिओ व डिजिटल फाइल्स सादर केल्याचा दावा केला आहे. या पुराव्यांमध्ये पोलिस अधिकारी, बिल्डर व हवाला ऑपरेटर यांच्यातील संभाषणे असल्याचे ते म्हणतात. एका रेकॉर्डिंगमध्ये चोरीचा तपास लावल्यास पोलिसांना बक्षीस देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोपही आहे. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांत यासंदर्भामध्ये गुन्हा दाखल झाला. मात्र, हद्दीनुसार तक्रार घोटी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. याआधीही अपघात, तस्करीच्या घटनांमुळे चर्चेत असलेला चोर्ला घाट (जि. बेळगाव) आता ४०० कोटींच्या आंतरराज्य काळ्या पैशांच्या चोरीमुळे राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे.
घोटीत चौघे जेरबंद; मुख्य सूत्रधार फरार
४०० कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटांच्या गैरव्यवहारातून उभ्या राहिलेल्या थरारक गुन्हेगारी प्रकरणात घोटी पोलिसांनी मोठी कारवाई करत जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ आणि जनार्दन धायगुडे या चार संशयित आरोपींना अटक केली आहे. मात्र, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार विराट गांधी (रा. गुजरात) तसेच व्हिडिओ कॉलवरून पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाणीचे आदेश देणारा किशोर सावला (बिल्डर) अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
फिर्यादीचे पिस्तुलाच्या धाकाने अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप संशयित आरोपींवर आहे. नवी मुंबई आणि कल्याण येथील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये लपून बसलेल्या आरोपींना गोपनीय खबऱ्यांच्या अचूक माहितीनुसार घोटी पोलिसांच्या धाडसी पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पूर्ण तयारीनिशी करण्यात आलेल्या कारवाईत त्यांना अखेर जेरबंद करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या चौघांना इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाशिक रोड येथील संदीप दत्ता पाटील यांच्या तक्रारीवरून घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी समाजात प्रभावशाली असल्याचे लक्षात येताच नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष तपास पथक स्थापन केले आहे. फरार आरोपींसह या गुन्ह्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कारवाईमुळे बाद नोटांच्या काळ्या व्यवहारात गुंतलेल्या टोळीत खळबळ उडाली असून, पुढील तपासात मोठे राजकीय, बांधकाम व्यावसायिक किंवा आर्थिक हितसंबंध उघडकीस येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चोर्ला घाटात 400 कोटींच्या नोटांची लूट; रिअल इस्टेट एजंटचं अपहरण करून मारहाण, नाशिक कनेक्शन उघड






