५ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर, तर ७ जानेवारी रोजी मोफत भव्य आरोग्य शिबिर
वाशिष्ठी कृषी महोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांचा अनोखा संगम
चिपळूण :वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन आणि सामाजिक जाणिवेचे नेतृत्व मानले जाणारे श्री. प्रशांत यादव यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त दि. ५ व ७ जानेवारी रोजी समाजोपयोगी आणि मानवीय संवेदनांना स्पर्श करणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे तर ७ जानेवारी रोजी मोफत भव्य आरोग्य शिबिर होणार आहे. वाशिष्ठी कृषी महोत्सव आणि प्रशांत यादव यांचा वाढदिवस या अनोख्या संगमात आरोग्यजागरूकता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून हे उपक्रम राबवले जात असून, सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ मिळावा, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमांची सुरुवात सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराने होणार आहे. हे शिबिर सकाळी १०.३० नंतर कृषी महोत्सवाच्या ठिकाणी चिपळूण नगरपरिषदेचे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदान, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे होणार असून, जीवनदायी रक्तसाठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत संजीवनी सर्जिकल व जनरल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर देखील कृषी महोत्सवाच्या ठिकाणी चिपळूण नगरपरिषदेचे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदान, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे होणार आहे. या शिबिरात सामान्य शस्त्रक्रिया विषयक आजारांपासून ते स्त्रीरोग व प्रसूतीविषयक समस्यांपर्यंत विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला, उपचार व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, हायड्रोसील, स्तनातील गाठी व आजार, सर्व प्रकारच्या अंगावरील गाठी, अपेंडिक्स, महिलांसाठी मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशय पिशवीचे आजार, मुलींचे वयात येताना होणारे बदल, पाळी जाताना व येताना होणारे बदल, वंध्यत्व-गर्भधारणेत अडथळा येणे, कुटुंब नियोजन पद्धती तसेच प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची तपासणी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या आरोग्य शिबिरात मूळव्याध व पोटविकार तज्ज्ञ डॉ. अक्षय विजय यादव (एम.एस. जनरल सर्जरी), आणि स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. पूजा ओंकार भुरण (बी.ए.एम.एस., डी.जी.ओ.) नागरिकांची मोफत तपासणी करणार असून, गरजू रुग्णांसाठी अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याकरिता नावनोंदणीसाठी ९४२२६६११९७ , ९४२११३४३३६ किंवा ९८९०३९३८२३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी देण्याचा हा आदर्श उपक्रम असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या सेवाभावी उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव आणि डॉ. कु. स्वामिनी प्रशांत यादव यांनी केले आहे.






