रत्नागिरी : शासनाच्या आदेशानुसार देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा देशभक्तीचा उत्साह दामले विद्यालयातील अंगणवाडी क्रमांक 17 मध्येही उसळला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या विशेष कार्यक्रमात लहानग्या बालकांनी तिरंग्याबद्दलचे प्रेम आणि अभिमान आपल्या कलाकृतीतून व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना तिरंग्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून त्याची भूमिका समजावून सांगण्यापासून झाली. त्यानंतर देशभक्तीपर समूहगीत सादरीकरणाने वातावरण भारून गेले. रंगीत खडू, ब्रश आणि रंग यांच्या सहाय्याने मुलांनी तिरंग्याची चित्रे रेखाटली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या हाताच्या ठश्यांमधून सुंदर तिरंगा तयार करून कलात्मकता आणि देशप्रेमाची एकत्रित झलक दाखवली.
या उपक्रमात अंगणवाडीतील सर्व विद्यार्थी, शिक्षिका व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. लहानग्यांच्या निरागस हास्याने आणि देशभक्तीने भारलेल्या कलाकृतींनी परिसरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दुणावला. हा उपक्रम मुलांच्या मनात देशभक्तीची बीजे पेरणारा ठरला.
दामले विद्यालय अंगणवाडीत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा देशभक्तीमय जल्लोष
