रत्नागिरी : खेडशी ग्रामपंचायत हद्दीतील श्रीनगर येथे जय भैरी श्रीनगर क्रिकेट क्लबतर्फे आयोजित भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खेडशी ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक ५ च्या सदस्या कांचन कोकितकर आणि राजकुमार रोडलाईन्सचे सर्वेसर्वा राजकुमार कोकितकर यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत सलग पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेला क्रिकेट संघ आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे केवळ तरुणांनीच नव्हे, तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ५ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांना टी-शर्टचे (जर्सी) वाटप करण्यात आले, जो या स्पर्धेतील एक आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरला. या पाच दिवसांच्या कालावधीत अनेक मान्यवरांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेटी देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला.
क्रीडा गुणवत्तेला वाव देण्यासाठी स्पर्धेत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी १५,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १०,००० रुपये, तृतीय क्रमांकासाठी ६,००० रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी ३,००० रुपये रोख रक्कम व आकर्षक सन्मानचिन्हे देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले. याव्यतिरिक्त मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.
कांचन कोकितकर आणि राजकुमार कोकितकर हे नेहमीच परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. महिला आणि इतर घटकांसाठी विविध कार्यक्रम घेण्यासोबतच तरुणांसाठी या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ही स्पर्धा केवळ तरुणांपुरती मर्यादित न राहता आबालवृद्धांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. या संपूर्ण स्पर्धेचा आर्थिक भार कांचन कोकितकर आणि राजकुमार कोकितकर यांनी उचलला असून, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी त्यांनी जातीने लक्ष दिले. जय भैरी श्रीनगर क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांनी आणि खेळाडूंनी घेतलेली अपार मेहनत आणि चोख नियोजनामुळे ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडली.






