राजापूर: ग्रामविकासाच्या क्षेत्रात आदर्श ठरलेल्या हिवरे बाजारचे सरपंच, पद्मश्री पोपटराव पवार यांचे “यशोगाथा ग्रामविकासाची” या विषयावरील व्याख्यान रायपाटण येथे शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
ग्रामविकासाच्या दिशेने कार्य करणारे ग्रामस्थ, युवक, महिला बचतगट तसेच सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून रायपाटण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान करणाऱ्या ग्रामविकास शिलेदारांचा सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमास खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पोपटराव पवार यांच्या कार्याचा अनुभव आणि ग्रामविकासातील विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना मिळणार आहे. हिवरे बाजार या आदर्श गावाच्या उभारणीत त्यांनी जलसंधारण, पारदर्शक ग्रामशासन, लोकसहभाग आणि शाश्वत विकास यांसारख्या संकल्पनांचा यशस्वी वापर करून देशभरात आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने सन २०२० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
त्यांच्या व्याख्यानातून ग्रामीण भागात लोकसहभागातून विकास कसा साधता येतो, याबाबत मार्गदर्शन मिळणार असल्याने तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. समृद्ध कोकण, रत्नागिरी आणि जागृत सेवा मंडळ, रायपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
राजापूर: रायपाटण येथे पद्मश्री पोपटराव पवार यांचे व्याख्यान







