GRAMIN SEARCH BANNER

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! जगबुडीच्या पुलावर कारचा थरारक अपघात; चालक सुदैवाने बचावला

Gramin Varta
325 Views


खेड : रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट नदीच्या संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा वेग अधिक असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि क्षणार्धात गाडी रस्त्यावरून घसरून थेट पुलाच्या कठड्यावर चढली. जर कार या संरक्षक कठड्याला धडकून तिथेच अडकली नसती, तर ती थेट शंभर ते दीडशे फूट खोल जगबुडी नदीच्या पात्रात कोसळली असती. कार कठड्यावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून चालकाचे दैव बलवत्तर म्हणूनच तो या मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडला.

अपघाताचा आवाज होताच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनधारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली. अपघातामुळे या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या भीषण अपघाताच्या निमित्ताने मुंबई-गोवा महामार्गावरील अनियंत्रित वेग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

3353950
Share This Article