GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: गुहागर  येथे पर्यटनासाठी आलेले दोन पर्यटक बुडाले

Gramin Varta
417 Views

गुहागर : तालुक्यात आज 3 मे रविवारी सकाळी समुद्रात बुडण्याची धक्कादायक घटना घडली. सांगली जिल्ह्यातून फिरण्यासाठी आलेले दोन पर्यटक समुद्राच्या लाटांमध्ये अडकून बुडू लागले. मात्र, प्रसंगावधान राखत स्थानिक तरुणांनी धाडसाने समुद्रात उडी घेत दोघांचेही प्राण वाचवले.

ही घटना गुहागरमधील खालचापाट परिसरात, किस्मत हॉटेल मागील किनाऱ्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील हे पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यावर अचानक समुद्राची पातळी वाढली आणि जोरदार लाटांमुळे ते दोघेही खोल पाण्यात ओढले गेले.

त्यांना बुडताना पाहताच किनाऱ्यावर उपस्थित स्थानिक तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता तात्काळ समुद्रात उडी घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांनी दोन्ही पर्यटकांना बाहेर काढले. या धाडसी बचावकार्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच गुहागर नगरपंचायतीने समुद्रकिनारी नेमलेले सुरक्षा रक्षक (लाईफगार्ड) कमी केल्याची माहिती समोर येत असून मासिक वेतन न मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन किनाऱ्यावर पुन्हा पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी केली आहे. तसेच, पर्यटकांनीही समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3365687
Share This Article