GRAMIN SEARCH BANNER

गुहागरमध्ये घरफोडी; सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

Gramin Varta
100 Views

गुहागर: तालुक्यातील खालचापाट येथे बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ३१ हजार ५०० रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र शरद शिंदे (वय ४९, रा. गुहागर खालचापाट) हे घराला कुलूप लावून कामानिमित्त कल्याण-ठाणे येथे गेले होते. घरामध्ये कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाची कडी कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला.

चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप उचकटून लॉकरमधील लग्नाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि वायफाय राउटर लंपास केले. यामध्ये ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, ८० हजार रुपयांचे मणीमंगळसूत्र, ४० हजार रुपयांच्या अंगठ्या, ६० हजार रुपयांची रोख रक्कम आणि १५०० रुपये किमतीचा राउटर अशा एकूण २ लाख ३१ हजार ५०० रुपयांच्या मालाचा समावेश आहे. शिंदे हे गावी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने ही चोरी उघडकीस आली. या घटनेची फिर्याद त्यांनी १ मे रोजी गुहागर पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा नोंदवला आहे. भरवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3371730
Share This Article