GRAMIN SEARCH BANNER

डिंगणी–पिरंदवणे परिसरात खैर तस्करांचा उच्छाद;वनविभाग झोपेत की संगनमतात?.

Gramin Varta
200 Views

संगमेश्वर /एजाज पटेल : डिंगणी तसेच पिरंदवणे गावाच्या हद्दीत दुर्मिळ व मौल्यवान खैर वृक्षांवर सध्या अक्षरशः कुऱ्हाडीचे घाव घातले जात आहेत. या भागात खैर तस्करांचे टोळके निर्धास्तपणे वावरत असून त्यांना कायद्याची कोणतीही भीती उरलेली नाही, असे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दिवसा उजेडात खैर वृक्षांची सर्रास तोड करून त्याची वाहतूक केली जात असताना वनविभाग मात्र पूर्णपणे अंध व बहिरा झाल्याचे दिसून येत आहे.

डिंगणी–पिरंदवणे मुख्य रस्त्यालगत, नागरिकांच्या सततच्या वर्दळीच्या ठिकाणी खैर वृक्ष जमीनदोस्त करून त्यांची साल काढण्याचे काम खुलेआम सुरू आहे. ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या नजरेस हे प्रकार सहज पडत असताना, संबंधित वनरक्षक, वनपाल व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे कसे दिसत नाही, हा प्रश्न आता केवळ प्रश्न न राहता संशयात रूपांतरित झाला आहे.

खैर वृक्ष ही केवळ झाडांची तोड नसून शासनाच्या वनसंपदेची लूट आहे. तरीही खैर तस्कर इतक्या निर्धास्तपणे कारवाया करत असल्याने त्यामागे कोणाचा वरदहस्त आहे, याची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे. खैर तोड माफिया आणि वनविभागातील काही घटकांमध्ये अर्थपूर्ण संगनमत तर नाही ना, असा गंभीर आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या भागात यापूर्वीही खैर तोडीचे प्रकार घडले असून तक्रारी करूनही कारवाई केवळ कागदोपत्रीच झाली. परिणामी तस्करांचे मनोबल वाढले असून त्यांनी जंगलच नव्हे तर रस्त्यालगतची झाडेही लक्ष्य केली आहेत. वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे तस्करांना मोकळे रान मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पर्यावरणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला खैर वृक्ष काही पैशांच्या लालसेपोटी नष्ट केला जात असताना प्रशासनाची ही उदासीनता भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. वनसंवर्धनाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनीच जर अशा प्रकारे दुर्लक्ष केले, तर या परिसरातील जंगलांचे अस्तित्वच प्रश्नात येणार आहे.आता तरी वरिष्ठ वनाधिकारी व जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई करणार का, की खैर तस्करांचा हा उच्छाद असाच सुरू राहणार, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Total Visitor Counter

3388237
Share This Article