मुंबई: चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम येथील इनामी जमिनी पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या स्थानिक कुळ शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर लावण्यात यावीत, अशी आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चिपळूण तालुक्यातील या महत्त्वाच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद देत महसूल मंत्र्यांनी लवकरच बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे. या निवेदनात नमूद केल्यानुसार, सन १९५७ मध्ये कुळ कायदा संपुष्टात येऊनही या जमिनींबाबत अद्याप योग्य कार्यवाही झालेली नाही. उलट १९७२ च्या फेरफारमध्ये श्रीदेव भार्गवराम देवस्थानाचे नाव सातबारावर नोंदवल्याने प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे.
या अन्यायाविरोधात पेढे परशुराम येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने आणि उपोषणांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. २०१७ आणि २०१८ मध्ये झालेल्या विविध बैठकांमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या चौपद्रीकरणाचा मोबदला वाटपाबाबत काही निर्णय झाले होते, मात्र अद्याप कोणताही ठोस शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या जमिनींवर स्थानिक कुळांची वहिवाट असताना १९७२ मधील फेरफार नोंदीमुळे शेतकऱ्यांचे हक्क डावलले गेले आहेत. त्यामुळे देवस्थानचे नाव रद्द करून प्रत्यक्ष वहिवाट करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे मालक म्हणून लावण्यात यावीत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. हा प्रश्न तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना १०० टक्के मोबदल्याचा हक्क मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आमदार निकम यांनी व्यक्त केली आहे.







