GRAMIN SEARCH BANNER

मतदार यादीतील घोटाळ्याचा मोठा पुरावा लवकरच समोर आणणार – संजय राऊत

Gramin Varta
50 Views

मुंबई: महायुतीचा विजय हा प्रामाणिक मतांमुळे नव्हे, तर मतचोरीच्या संगनमतातून झालेला आहे. सध्याच्या मतदार यादीतील घोटाळा प्रकरणात मोठे पुरावे असल्याचा दावा करत त्यांनी भाजपावर मतदार यादीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला.

“मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढत आम्ही हे सर्व प्रकार उघडकीस आणणार आहोत. मतदार यादीतील खोट्या नावांचा पुरावा लवकरच समोर आणू,” असा इशाराही शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी दिला.

दिवाळीचा काळ साधारणतः शुभेच्छा, संवाद आणि सौहार्दाचा असतो. परंतु या वर्षीचा दिवाळीचा आठवडा महाराष्ट्रात चांगलाच ‘राजकीय स्फोटां’नी गाजत आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत भाजपावर थेट हल्लाबोल करत पुन्हा एकदा वातावरण तापवले. “ऐसा कोई सगा नही, जिसको भाजपने ठगा नही” या त्यांच्या जुन्या विधानाची पुनरावृत्ती करत राऊत यांनी भाजपाच्या ‘ऑपरेशन लोटस’ राजकारणावर, मतदार याद्यांतील घोटाळ्यांवर आणि सत्तेसाठी सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार टीका केली.

पत्रकार परिषदेत राऊतांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानाचे कौतुक करत, “देशावर संकट आले की लोक माझे नाव घेतात, ही बारामतीची ताकद आहे,” हे पवारांचे वाक्य उद्धृत केले. त्यांनी पुढे म्हटलं, “संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जातो, हा इतिहास आहे. मोदी आणि अमित शाह यांना कधी काळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मदत केली होती, पण त्याचे पांग भाजपने कसे फेडले हे सगळ्यांनी पाहिले.”

दरम्यान, सोलापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातील चार माजी आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “ही भाजपाची राजकीय भूक आहे. सत्तेसाठी ते कुठल्याही पातळीवर जाऊ शकतात.” त्यांनी भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर पुन्हा एकदा निशाणा साधला.

राऊत यांनी मनसेच्या संभाव्य भूमिकेवरही संकेत दिले. “शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत मनसेचा प्रवेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,” असं त्यांनी नमूद केलं. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात नवीन समीकरणं आकार घेतील, असे संकेत मिळत आहेत.

भाजपाचा महापौर होईल या ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांच्या विधानावरही राऊतांनी टीका करत “ते नक्की मराठी आहेत ना?” असा उपरोधिक प्रश्न केला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शाब्दिक फटाके उडवत सत्ताधाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. महाविकास आघाडीकडून लवकरच ‘मतदार संघर्ष यात्रा’ काढली जाणार असून, या यात्रेद्वारे मतदार यादीतील अनियमितता आणि मतचोरीविरोधात राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार आहे.

Total Visitor Counter

2682446
Share This Article