गुहागर : तालुक्यातील त्रिशूल साखरी येथील समुद्रकिनारी एका बेपत्ता तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा तरुण गेले तीन दिवस बेपत्ता होता. त्याने घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता.
नितिन जगन्नाथ पवार (वय ३०, रा. कारूळ विसापूर, बौद्धवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. नितिनला गेल्या तीन वर्षांपासून काविळीचा आजार होता. त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याने त्याच्यावर डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, तो १२ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता.
नितिनच्या कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूच्या परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. त्यामुळे त्याचे वडील जगन्नाथ पवार यांनी १४ सप्टेंबर रोजी गुहागर पोलीस ठाण्यात नितिन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
१७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्रिशूल साखरी येथील जेटीच्या किनारी, पाण्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह उपड्या स्थितीत तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवली असता तो बेपत्ता झालेला नितिन पवार असल्याचे समोर आले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुहागर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
गुहागर : 3 दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा समुद्रकिनारी मृतदेह सापडला
