GRAMIN SEARCH BANNER

कोकणातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ सेंटरची स्थापना होणार

Gramin Search
6 Views

रत्नागिरी: कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. या संदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्यात चर्चा झाली.

कोकणातील कृषी विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांना विशेष चर्चेसाठी आमंत्रित केले होते. ही बैठक ‘सिल्व्हर ओक’ येथे घेण्यात आली. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

या दोघांमध्ये झालेल्या बैठकीत शरद पवार आणि आमदार निकम यांनी कोकणातील पारंपरिक शेती पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर, हवामानानुसार पीक पद्धती, शाश्वत शेती आणि युवकांना कृषी क्षेत्रात आकर्षित करण्याबाबत सखोल चर्चा केली. आमदार निकम यांनी कोकणातील स्थानिक शेतीच्या समस्या यावेळी सांगितल्या.

त्यावेळी शरद पवार यांनी कृषी तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, हवामान अंदाज, पीक संरक्षण, रोबोटिक्स वापराबाबत माहिती दिली. कोकणासारख्या निसर्गसमृद्ध भागात एआयचा वापर केल्यास शेती अर्थव्यवस्थेला महत्त्वाची मदत होऊ शकते. या चर्चेचा पुढील टप्पा म्हणून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात कृषी संशोधन संस्था आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या सहभागाने एक विशेष समिती लवकरच स्थापन केली जाणार आहे. त्यावेळी अत्याधुनिक एआय सेंटर उभारण्यासाठी संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे. या घडामोडीमुळे कोकणात आधुनिक कृषी क्रांतीचा एक नवा अध्याय सुरू होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. आमदार शेखर निकम यांनी अशा उपक्रमांना सहकार्य देण्याची ग्वाही दिली असून, भविष्यात कोकणातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार शेखर निकम व जेष्ट नेते शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

Total Visitor Counter

2647127
Share This Article