रत्नागिरी : तालुक्यातील सोमेश्वर येथे वास्तव्यास असलेल्या मकरंद यशवंत जाधव (वय ४८) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना ताप व अंगदुखीचा त्रास असल्याने खाजगी रुग्णालयातून औषधोपचार घेतल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी सकाळी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून रक्त येत असल्याने तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मूळचे करबुडे येथील रहिवासी असलेले मकरंद जाधव गेल्या काही दिवसांपासून सोमेश्वर येथे राहत होते. त्यांना पूर्वी पॅरालिसिसचा आजार होता, ज्यातून ते बरे झाले होते. दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांना अचानक ताप आणि हात-पाय दुखू लागले. त्यामुळे त्यांनी सोमेश्वर येथील एका खाजगी दवाखान्यात जाऊन औषधे घेतली. त्यानंतर ते घरी परतले, जेवण केले आणि झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता त्यांचे मित्र निखिल पवार त्यांना उठवण्यासाठी गेले असता, जाधव बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून त्यांना तात्काळ रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी : करबुडे येथील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
