GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: राधाकृष्ण नगर येथे दुचाकी खोल नाल्यात कोसळून तिघेजण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Gramin Varta
681 Views

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील राधाकृष्ण नगर येथील मुत्तपन मंदिर स्वागत कमानीजवळ सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. बहादूरशेख नाका ते डीबीजे महाविद्यालयाच्या दिशेने ट्रिपल सीट जाणाऱ्या एका ॲक्टिवा दुचाकीवरील ताबा सुटल्याने, दुचाकीसह तिघेजण खोल नाल्यात कोसळले. या अपघातात तिन्ही तरुण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही तरुण चिपळूण शहरातील रहिवासी असून त्यातील दोघेजण खंड विभागातील असल्याचे समजते. महामार्गावरून जात असताना मुत्तपन मंदिर परिसरातील वळणावर चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट खोल नाल्यात जाऊन पडली. या नाल्यातून नगर परिषदेची मोठी पोलादी पाईपलाईन गेली आहे, त्यावर हे तरुण आदळल्याने भीषण दुखापत झाली. यातील एका तरुणाच्या हाताला गंभीर मार लागला असून तो जागीच बेशुद्ध पडला होता, तर अन्य दोघेही जखमी अवस्थेत होते.

​अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि काही जण तात्काळ नाल्यात उतरले. मात्र, नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या उंच भिंतींमुळे जखमींना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. त्याच वेळी योगायोगाने महामार्गावरून एक क्रेन जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी प्रसंगावधान राखून क्रेन थांबवली आणि तिच्या सहाय्याने जखमी तरुणांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

Total Visitor Counter

3366874
Share This Article