रत्नागिरी: अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह देशभरातून लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील गावांमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कोकणचा गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून तो कोकणवासीयांसाठी एक जिव्हाळ्याचा सोहळा आहे. या सोहळ्याची ओढ आणि बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून या वर्षी सुमारे सहा ते सात लाख भाविक कोकणात येतील असा अंदाज आहे.
गणेशोत्सवासाठी प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने एकत्रितपणे ३२५ हून अधिक विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या सर्व गाड्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, अनेक गाड्या पूर्णपणे आरक्षित (Housefull) झाल्या आहेत. अनेक चाकरमानी तीन दिवस आधीच आपल्या गावी पोहोचले असून, काहीजण गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात दाखल होत आहेत. एकीकडे रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची सोय केली असली, तरी दुसरीकडे अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. तसेच, आरक्षित तिकीटांवरून होणारा गोंधळ आणि गर्दीचे योग्य नियोजन नसल्याच्या तक्रारीही काही प्रवाशांनी केल्या आहेत. तरीही, आपल्या लाडक्या बाप्पाच्या भेटीची ओढ त्यांना सर्व अडचणींवर मात करायला लावत आहे.
गणेशोत्सवाच्या या उत्साहामुळे कोकण रेल्वे स्टेशनवर आणि महामार्गांवर एक वेगळेच चैतन्य पसरले आहे. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात आणि आपल्या माणसांमध्ये गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी कोकणवासीय आतुरतेने वाट पाहत आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेत प्रवाशांची तुफान गर्दी; लाखो चाकरमानी कोकणात दाखल
