GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात मुसळधार पावसामुळे पडझड; तळसर येथे घरावर भिंत कोसळली

Gramin Search
30 Views

चिपळूण: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या आहेत. वाशिष्ठी आणि शिवनदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने काही ठिकाणी पाणी पात्राबाहेर आले होते. काल, बुधवारी (१८ जून) झालेल्या पावसामुळे चिपळूण तालुक्यात सरासरी २३.५६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे मोठे नुकसान झाले नसले तरी, पडझडीचे काही प्रकार समोर आले आहेत. मौजे तळसर येथील अजय जयराम माहिते यांच्या घराबाहेरची भिंत कोसळून घराचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, मार्गताम्हाणे येथील रवींद्र देवजी तांबिटकर यांच्या मालकीचा गोठा कोसळून नुकसान झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

काल दिवसभरात चिपळूण मंडळात ७ मि.मी., खेर्डी २१ मि.मी., वहाळ ४० मि.मी., कळकवणे १५ मि.मी., मार्गताम्हाणे २२ मि.मी., शिरगाव ३४ मि.मी., रामपूर २६ मि.मी., असुर्डे २४ मि.मी. आणि सावर्डे २३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण ४७८ मि.मी. पाऊस पडला आहे.

सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असते त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, आवश्यकतेनुसार मदतकार्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3378944
Share This Article