GRAMIN SEARCH BANNER

लांजा : इसवली गुरववाडी येथे नातेवाइकावर कोयत्याने हल्ला

Gramin Varta
316 Views

लांजा : तालुक्यातील इसवली गुरववाडी येथे किरकोळ वादातून एका वृद्धाने आपल्या नातेवाइकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता घडली असून, संजय गुरव यांच्या फिर्यादीवरून प्रकाश गुरव यांच्यावर लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यशवंत गुरव (वय ५०) आणि प्रकाश सोनू गुरव (वय ७५, दोघेही रा. इसवली गुरववाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) हे सख्खे नातेवाईक असून, एकाच घरात स्वतंत्र खोल्यांमध्ये राहतात. घटनेच्या वेळी घराच्या ओट्यावर भात झोडणीचे काम सुरू असताना संजय यांनी प्रकाश यांना झोपण्याच्या जागेची साफसफाई करण्यास सांगितले. यावरून प्रकाश यांना राग आला आणि त्यांनी घरातील कोयती आणून संजय यांच्यावर हल्ला केला.

संजय यांनी डाव्या हाताने कोयती पकडून बचाव करण्याचा प्रयत्न केला असता, प्रकाश यांनी ती जोरात ओढल्याने संजय यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर प्रकाश यांनी संजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

घटनेनंतर संजय गुरव यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले व २८ ऑक्टोबर रोजी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी प्रकाश गुरव यांच्यावर भा.दं.सं. १८६० चे कलम ३५२, ३२४, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नासिर नावळेकर करत आहेत.

Total Visitor Counter

3199515
Share This Article