उद्या लांजा तहसील कार्यालयासमोर आंदोलनाची हाक
लांजा : शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग मानधन वाढ तसेच विविध मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे येत्या २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक आंदोलने करूनही सरकारकडून दिव्यांग, शेतकरी व शेतमजुरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आली असून लांजा तालुक्यातील शेकडो दिव्यांग, शेतकरी व कामगार या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या आंदोलनासंदर्भात लांजा पोलीस ठाण्यात निवेदनही सादर करण्यात आले आहे. तसेच या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि दिव्यांग जनकल्याण समिती यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यापूर्वीही अन्नत्याग आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने अखेर २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आंदोलनात सर्व दिव्यांग, शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे आणि आपले हक्क सरकारपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन प्रहार संघटनेतर्फे करण्यात आले आहे.