GRAMIN SEARCH BANNER

कबुतरखाना आंदोलन प्रकरणी १५० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल; ५० हून अधिक महिलांचा समावेश

मुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने दादर येथील कबूतरखाना बांबू व ताडपत्रीने बंद केला होता. मात्र त्याविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून तेथे धुडगूस घालण्यात आला होता. काही महिलांनी चाकूने ताडपत्री फाडून बांबू उचकटून टाकले होते.

याप्रकरणी १५० जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल, बेकायदा जमावबंदी व महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेकडून कोणतीही तक्रार करण्यात न आल्यामुळे अखेर पोलिसांनीच याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

कबुतरखान्यात पक्ष्यांना खाद्या टाकू नये, तसेच कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने पोलीस बंदोबस्तात दादर येथील कबुतरखाना बांबू व ताडपत्री बांधून बंद केला होता. असे असतानाही ६ ऑगस्ट रोजी सकाळी ९च्या सुमारास काही पक्षी प्रेमी व जैन समुदायातील नागरिकांनी कबुतरखाना येथे विनापरवानगी जमाव जमवून आंदोलन केले.

आंदोलकांनी घोषणाबाजी करीत थेट कबुतरखान्यावर हल्ला चढवला होता. संतप्त महिला आंदोलकांनी बंदोबस्तासाठी तैनात महिला अमंलदारांना धक्काबुक्की करून चाकुने ताडपत्री फाडल्या, शिवाय रस्सी कापून बांबू उखडून टाकले होते. दरम्यान, तेव्हा पोलिसांनी वेळीच कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. आंदोलकांच्या त्या कृतीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

जवळपास दीडशे आंदोलकांवर दंगल करणे, विनापरवाना आंदोलन, निदर्शने करणे, शासकिय मालमत्तेचे नुकसान करणे, कायदा व सुव्यवस्था बिघडवणे, आंदोलनात चाकुचा वापर करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दादर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Total Visitor Counter

2475011
Share This Article