GRAMIN SEARCH BANNER

लांजा: शेतातील वणवा विझवताना होरपळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
644 Views

लांजा: तालुक्यातील प्रभानवल्ली गोसावीवाडी येथे शेतातील वणवा विझवण्यासाठी गेलेल्या एका ५८ वर्षीय शेतकऱ्याचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली. विष्णू महादेव खेगडे असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण लांजा तालुक्यात शोककळा पसरली आहे. निसर्गाच्या कोपाने एका कष्टाळू शेतकऱ्याचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू खेगडे यांची प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील ‘कटकी’ नावाच्या डोंगराळ भागात स्वतःची मालकीची जमीन आहे. सोमवारी २३ मार्च रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास या जमिनीवरील सुकलेल्या गवताला अचानक आग लागून वणवा पेटला होता. ही आग आपल्या पिकांचे किंवा झाडांचे नुकसान करेल या भीतीने विष्णू खेगडे हे एकटेच आग विझवण्यासाठी धावले. मात्र, वाऱ्याचा वेग आणि सुकलेल्या गवतामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. आग विझवण्याच्या प्रयत्नात असतानाच खेगडे हे आगीच्या वेढ्यात सापडले आणि गंभीररीत्या भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दुपारपासून विष्णू खेगडे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृत विष्णू खेगडे यांच्या पत्नी वनिता विष्णू खेगडे यांनी या घटनेची माहिती लांजा पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्री ९.५९ वाजता या घटनेची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे. वाढत्या उन्हामुळे लागणाऱ्या वणव्यांनी एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3375085
Share This Article