खेड: अंगणात खेळत असताना उशिराने लक्षात आलेल्या सर्पदंशामुळे उपचाराला कमी कालावधी मिळाल्याने, खेड तालुक्यातील दाभिळ कुंभारवाडी येथील सात वर्षांच्या सान्वी संदेश पडवेकर या चिमुकलीची तब्बल १३ दिवस सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर थांबली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सान्वी ही १० जून रोजी शाळेतून घरी परतल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. त्याचवेळी घराच्या पडवीत एक साप आल्याचे तिने पाहिले. तिने आरडाओरड करून घरातल्यांना सापाची कल्पना दिली. मात्र, या गडबडीत तिला सापाने दंश केल्याचे तिच्या लक्षात आले नाही आणि ती पुन्हा खेळण्यात रमून गेली. काही वेळाने ती पडली आणि तिच्या डोक्याला खरचटले, तसेच तिच्या दातालाही मार लागला होता.
सान्वीला झालेला सर्पदंश वेळीच लक्षात न आल्याने तिच्या उपचारात महत्त्वाचा वेळ गेला. सान्वीचे वडील संदेश आणि आई सरस्वती यांनी तात्काळ तिला जवळच्या लोटे येथील एका रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना तिचा दात काढण्यात आला. मात्र, त्यानंतर तिला रक्तस्त्राव सुरू झाला, जो थांबत नव्हता. अखेर तिच्या रक्तातील पेशींची तपासणी केली असता, त्या २३ हजारांवर आल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी तिला अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार, सान्वीला कराड येथे हलवण्यात आले. तिथे तपासणी केल्यानंतर तिला सर्पदंश झाल्याचे अखेर उघड झाले. तिच्यावर १४ जूनपर्यंत उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच २२ जून रोजी सान्वीची प्राणज्योत मालवली.
सान्वी ही जिल्हा परिषद शाळा, दाभिळ जांभूळवाडी येथे इयत्ता दुसरीमध्ये शिकत होती. तिच्या पश्चात आई-वडील आणि बालवाडीत शिकणारा एक लहान भाऊ आहे. सर्पदंशाने झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पडवेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी लहान मुलांना खेळताना अधिक काळजी घेण्याचे आणि सर्पदंशाची शंका आल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले आहे.