GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडात व्हिडिओ शुटींगच्या संशयावरून चुलत भावाचा पाय सायलेंसरला लाऊन भाजले; मोबाईलची तोडफोड करत बेदम मारहाण

मंडणगड: तालुक्यातील शिपोळे बंदर येथे व्हिडिओ शूटिंग केल्याच्या संशयावरून एका ४७ वर्षीय व्यक्तीला त्याच्याच चुलत भावाने आणि कुटुंबीयांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीदरम्यान आरोपीने पीडित व्यक्तीचा पाय जबरदस्तीने दुचाकीच्या गरम सायलेंसरला लावल्याने ती गंभीररीत्या भाजली असून, त्यांचा महागडा मोबाईलही रस्त्यावर आपटून फोडण्यात आला. या प्रकरणी बाणकोट पोलीस ठाण्यात रशीद शरीफ लांबे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमान सईद लांबे (वय ४७, रा. शिपोळे बंदर) असे या घटनेतील जखमी फिर्यादीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी जमान लांबे हे आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. ते चुलत भाऊ रशीद लांबे यांच्या घराजवळ आले असता, संशयित आरोपी नवाब लांबे याने त्यांची गाडी अडवली. “तू माझ्या गाडीचे व्हिडिओ शूटिंग केले आहेस, तुझा मोबाईल दाखव,” असे म्हणत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. फिर्यादीने मोबाईल देण्यास नकार देताच आरोपीने त्यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर रशीद लांबे, सैफ लांबे आणि जेसीबी ऑपरेटर यांनी तिथे येऊन फिर्यादीला पकडून ठेवले. यावेळी झालेल्या झटापटीत रशीद लांबे यांनी फिर्यादीचा डावा पाय दुचाकीच्या अतिशय गरम असलेल्या सायलेंसरला दाबून धरला, ज्यामध्ये त्यांच्या पायाच्या पोटरीला गंभीर जखम झाली. या गोंधळात फिर्यादीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हिसकावून तो रस्त्यावर आपटून फोडण्यात आला, तसेच फिर्यादीच्या खिशातील ११,३०० रुपये रोकड आणि गळ्यातील सोन्याची एकसरी हरवली आहे. या घटनेनंतर रेश्मा लांबे यांनीही घटनास्थळी येऊन फिर्यादीचे शर्ट ओढून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3480291
Share This Article