लांजा/ सिकंदर फरास: रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी आज मुंबईतील रत्नागिरी–संगमेश्वर येथील मुंबईस्थित विविध मंडळांसमवेत महत्त्वपूर्ण संवाद साधला. दादर (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेला मुंबईतील १५५ मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा सादर करत, या वर्षभरात रत्नागिरी मतदारसंघात झालेल्या विविध विकासकामांचा कार्यअहवाल मुंबईकर बांधवांसमोर ठेवला. रत्नागिरीच्या विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना, मुंबईतील रत्नागिरीकर बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची ही संधी अत्यंत मोलाची ठरली, असे मत त्यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मुंबईतील प्रत्येक रत्नागिरीकराचे सहकार्य आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणखी जोमाने कार्य करत राहू, असा निर्धार मा. ना. उदयजी सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. रत्नागिरीच्या विकासाची बांधिलकी या भेटीतून अधिक दृढ झाली असून, विकासाच्या प्रक्रियेत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. मुंबईतील या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, जिल्ह्याच्या विकासात सक्रिय योगदान देण्याची तयारी दर्शवली. रत्नागिरीच्या विकासाच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.