दिल्ली: देशातील सर्वसामान्यांसाठी ऑक्टोबर महिना महत्त्वाचा ठरणार आहे. कारण 1 ऑक्टोबरपासून काही नवे नियम लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.
यात रेल्वे प्रवास, पेंशन खाते, डिजिटल पेमेंट्स (UPI) तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल होणार आहेत. याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.
रेल्वे प्रवाशांसाठी होणारे महत्वाचे नियम
1 ऑक्टोबरपासून ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी नवा नियम लागू होणार आहे. आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत फक्त आधार कार्ड व्हेरिफाइड प्रवासी IRCTC वेबसाइट आणि अॅपद्वारे तिकीट बुक करू शकतील. हा नियम आधी फक्त तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागू होता, मात्र आता तो सर्वसाधारण आरक्षणासाठीही लागू होणार आहे. रेल्वे काउंटरवरून तिकीट घेणाऱ्यांसाठी मात्र हा नियम लागू नसेल.
पेंशनधारकांसाठी नवा बदल
पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने शुल्क संरचनेत बदल केला आहे. नवे PRAN खाते उघडताना e -PRAN किटसाठी 18 रुपये आणि फिजिकल कार्डसाठी 40 रुपये शुल्क आकारले जाणार.
प्रत्येक खात्यावर वार्षिक मेंटेनन्स चार्ज 100 रुपये आकारला जाणार आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.
UPI व्यवहारांवर येणाऱ्या नवीन मर्यादा :-
डिजिटल व्यवहार (Digital Payments) करणाऱ्यांसाठीही महत्वाची बातमी आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सुरक्षेच्या दृष्टीने पीअर-टू-पीअर (P2P) व्यवहारांवर काही मर्यादा आणण्याचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या अँप्सद्व्यारे थेट व्यक्ती – ते – व्यक्ती होणाऱ्या व्यवहारांवर निर्बंध लागू होऊ शकतात. या संदर्भातील अंतिम निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे.
गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल
एप्रिलपासून घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत, मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वेळोवेळी बदल झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी नवीन दर जाहीर होतात, त्यामुळे 1 ऑक्टोबर रोजी गॅस सिलिंडरचे नवे दर लागू होणार आहेत.