रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील उक्षी-भेळी चिंचपार येथील बेपत्ता असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह करबुडे येथील बावनदीच्या पात्रात मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक शांताराम गोणबरे असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गोणबरे हे आपल्या घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून न आल्याने अखेर त्यांच्या पत्नी सौ. दिक्षा दीपक गोणबरे यांनी २२ मार्च २०२६ रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद क्रमांक १२/२०२६ नुसार नोंद करण्यात आली होती.
दीपक गोणबरे यांना शोधण्यासाठी उक्षी गावातील तरुणांनी प्रचंड प्रयत्न केले.यामध्ये जुनेद खान, भागेश जाधव,दुर्गेश जाधव,संदीप जाधव,गावचे पोलिस पाटील अनिल जाधव, मनोहर गोणबरे,संतोष देवळेकर तसेच युसूफ हमदारे,असिर हमदारे, मुकद्दस काझी, मुदस्सिर काझी, मुझम्मील काझी यांनी बावनदी पात्रात होडीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली. तसेच जंगलमय भाग,डोंगर दऱ्यात शोध घेतला होता.
दीपक गोणबरे यांचा शोध पोलीस आणि त्यांचे नातेवाईक घेत असतानाच, २४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्यापूर्वी करबुडे येथील बावनदीच्या पवार कोंड नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना आढळून आला. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या दीपक गोणबरे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अब्दुल मुनाफ खतीब, रवींद्र जाधव,अनिल जाधव,माजी सरपंच मिलिंद खानविलकर, करबुडे गावचे पोलीस पाटील हरीश वेदरे तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री ७:४० वाजता या प्रकरणाची नोंद बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेत वैद्यकीय कार्यवाही करण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी विशेष सहकार्य केले.
दीपक गोणबरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई,वडील, भाऊ,वहिनी आणि पुतणी आहे.





