राजापूर : तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथे सामाईक विहिरीवरून पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा मोहन खानविलकर (वय ५४, रा. तेरवण थोरलीवाडी, ता. राजापूर) या दि. ६ मे २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घराच्या स्लॅबवरील कामासाठी तसेच गुरांना पाणी भरण्यासाठी सामाईक विहिरीवर गेल्या होत्या. त्यावेळी विहिरीवरील पाणी काढण्याचे साधन, रहाटाची कपी, रश्शी आणि दांडा जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी सत्यवान खानविलकर यांना विचारणा केली असता चंद्रकांत खानविलकर यांनी “मला माहिती नाही, मी काही काढले नाही,” असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सुवर्णा खानविलकर यांनी ही तिसऱ्यांदा अशी घटना घडत असल्याचे सांगितल्याने वाद वाढला. त्यानंतर चंद्रकांत खानविलकर, रविंद्र खानविलकर आणि सत्यवान खानविलकर यांनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद अधिक चिघळल्यानंतर “माझी कपी आणि रश्शी द्या, नाहीतर मी पंप कापून टाकेन,” असे फिर्यादी म्हणाल्या असता “जा काप,” असे चंद्रकांत खानविलकर यांनी सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, रुपाली रविंद्र खानविलकर या तेथे आल्या आणि त्यांनी हातातील लाकडी दांडक्याने सुवर्णा खानविलकर यांच्या डाव्या हाताच्या दंडावर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रुपाली रविंद्र खानविलकर, रविंद्र यशवंत खानविलकर, चंद्रकांत यशवंत खानविलकर आणि सत्यवान यशवंत खानविलकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजापूर पोलिस करत आहेत.
राजापूर : तेरवण थोरलीवाडी येथे सामाईक विहिरीवरील वादातून महिलेला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा






