GRAMIN SEARCH BANNER

उक्ताड वाहनतळावर तातडीची उपाययोजना

Gramin Varta
33 Views

नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार प्रशासनाची तत्काळ कारवाई

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या उक्ताड येथील अटलबिहारी वाजपेयी वाहनतळाबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केलेल्या पाहणीनंतर दिलेल्या सूचनांची प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी केली आहे. बुधवारी या वाहनतळाच्या तिन्ही बाजूंनी गेट सुरक्षित करण्यात आले असून गेट बंद करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे.

उक्ताड येथील हा वाहनतळ बाजारपेठेपासून दूर असल्याने गेल्या चार वर्षांपासून जवळपास वापराविना पडून असल्याचे पाहणीत निदर्शनास आले होते. तसेच तिन्ही बाजूंनी गेट नसल्याने या नगर पालिकेच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने गेट बसवून मालमत्तेची निगा राखण्याचे आदेश दिले होते.
नगराध्यक्षांच्या या सूचनेनुसार बुधवारी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत वाहनतळाचे तिन्ही गेट सुरक्षित केले आहेत. यामुळे अनधिकृत प्रवेशास आळा बसणार असून मालमत्तेची सुरक्षा वाढणार आहे.

दरम्यान, हा वाहनतळ वाहनचालकांच्या प्रत्यक्ष उपयोगात येत नसल्याने भविष्यात या जागेचा वापर करून नगर पालिकेला उत्पन्न मिळवता येईल का, याबाबतही विचार सुरू आहे. या संदर्भातील विषय लवकरच होणाऱ्या नगर परिषद कौन्सिल बैठकीत सभागृहासमोर मांडण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.

नगराध्यक्षांच्या पाहणीनंतर तातडीने झालेली ही कारवाई प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे उदाहरण ठरत असून, आगामी काळात या मालमत्तेबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याची चर्चा शहरात होत आहे.

Total Visitor Counter

3206619
Share This Article