कर्नाटक: कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यात गोकर्ना जवळच्या एका दुर्गम भागात एक रशियन महिला राहत असल्याची बाब आढळून आली आहे.
विशेष म्हणजे ही महिला तिच्या दोन मुलींसह एका गुहेत राहत होती. हा प्रकार उजेडात आल्यानंतर या महिलेची सर्वत्र चर्चा होत आहे. नीना कुटीना असं या महिलेचं नाव असून आता तिला तिच्या देशात परत पाठवलं जाणार आहे.
कुमटा तालुक्यातील रामतीर्थ टेकड्यांमधील एका गुहेतून गोकर्ण येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीधर एसआर आणि त्यांच्या पथकाने या महिलेला शोधून काढले. ही महिला तिच्या सहा आणि चार वर्षांच्या मुलींबरोबरक येथे राहत होती. या महिलेला आणि तिच्या मुलांना रविवारी बंगळुरू येथे आणले जाणार आहे. यानंतर त्यांना रशियाला परत पाठवण्याची प्रक्रिया केली जाईल, कारण या रशियन महिलेच्या व्हिसाची मुदत २०१७ सालीच संपली आहे.
श्रीधर यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की कुटीना ही बिझनेस व्हिसावर २०१६ मध्ये पहिल्यांदा भारतात आली होती आणि सुरूवातीला ती गोवा आणि गोकर्ण येथील पर्यटन आणि रेस्टॉरंट यांच्याकडे आकर्षित झाली. “पण जेव्हा १७ एप्रिल २०१७ रोजी तिचा व्हिसा एक्सपायर झाला तेव्हा निघून जाण्याऐवजी तिने येथेच राहण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये एक्झिट परमीट मिळाल्यावर आणि काही काळासाठी नेपाळला गेल्यानंतरही ती भारतात परत आली आणि कर्नाटकच्या जंगलात बेपत्ता झाली,” असेही त्यांनी सांगितले.
“तिला जंगलात ध्यान आणि देवांची पूजा करणे खूप आवडायचे. जर ती हॉटेलमध्ये राहायला गेली तर तिला पकडले जाईल या भीतीने तिने जंगलात राहण्याचा निर्णय घेतला,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
मुलींचा जन्म भारतातच
पोलिसांनी सांगितले की तिच्या दोन्ही मुलींचा जन्म ती लपून राहत असताना भारतातच झाला. मात्र या मुलींच्या वडिलांबद्दल माहिती देण्यास तिने नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलींच्या प्रसूतीदरम्यान तिला कुठली वैद्यकीय मदत मिळाली होती का याचा प्रशासनाकडून तपास केला जात आहे.
श्रीधर आणि त्यांच्या पथकाला नियमीत गस्थ घालताना रामतीर्थ टेकड्यांवर ही महिला सापडली. पोलीस भूस्खलनाचा धोका असलेल्या भागात कोणी गेले आहे का याचा तपास करत होते, यावेळी त्यांना गुहेकडे जाणारे पायांचे ठसे आढळून आले.
या गुहेच्या दरवाज्याला लावण्यात आलेले प्लास्टीक आणि वेगवेगळ्ये देवतांचे फोटो यामुळे कोणीतरी या भागत राहत असल्याचे लक्षात आले. श्रीधर यांनी सांगितले की गुहेत काही रशियन पुस्तके देखील आढळून आली आहेत. आत गेल्यावर त्यांना एक मूल खेळत असल्याचे आढळून आले तर कुटीया आणि तिची दुसरी मुलगी शांतपणे झोपलेल्या होत्या.
पोलिसांना आढळून आले की हे तिघे येथे गेल्या दोन महिन्यांपासून राहत होते, नंतर खुलासा झाला की गेल्या आठ वर्षांपासून ही महिला लपून राहत होती.
साप आपले मित्र आहेत
“या भागात भुस्खलन होण्याची शक्यता आहे असे सांगून आम्हाला तिला बाहेर येण्यासाठी पटवून द्यावे लागले,” असे श्रीधर म्हणाले. ते पुढे म्हणाले की जेव्हा आम्ही तिला या भागात असलेल्या सापांबद्दल इशारा दिला तेव्हा ती म्हणाली की, “साप आपले मित्र आहेत आणि जोपर्यंत आम्ही त्यांना त्रास देणार नाहीत ते आम्हाला इजा पोहचवत नाहीत.”
“तिने सांगितले की आंघोळीसाठी जवळच्या धबदब्याकडे गेल्यानंतर कसलीही आक्रमकता न दाखवता साप त्यांच्या जवळपास शांतपणे फिरत,” असे श्रीधर म्हणाले.
“पावसाळ्याच्या दिवसात, ते कमीत कमी कपड्यात राहत. कुटीयाने त्यांच्या गरजा भागवण्यासाठी गुहेत पुरेसा किराणा मालाचा साठा केला होता आणि त्यांच्याकडे मेणबत्त्या असूनही ते क्वचितच कृत्रिम प्रकाश वापरायचे, त्याऐवजी ते नैसर्गिक प्रकाशातच राहयचे,” असेही त्यांनी सांगितले.
श्रीधर यांनी सांगितले की हा त्यांच्या १८ वर्षांच्या सेवेतील सर्वात अनपेक्षित अनुभव होता. “मी काही तरूण आणि साधूंना जंगलात राहताना पाहिले आहे, पण एका आईला तिच्या मुलांसह कधीच नाही. ते सर्वजण निरोगी आणि मानसिकरित्या सुदृढ दिसतात,” असे ते म्हणाले.
परत पाठवले जात असल्याबद्दल दुखः
श्रीधर यांनी सांगितले की त्यांना रविवारी सकाळी कुटीने पाठवलेला एक रशियन भाषेत एक व्हॉट्सअॅप मेसेज मिळाला, ज्यामध्ये निसर्गापासून वेगळे झाल्याबद्दल तिने दुःख व्यक्त केले होते. “तिने लिहिले की तिला भारत, जंगल आणि ध्यान अवडायचे, पण आता तिला तिच्या देशात परत पाठवले जात असल्याबद्दल ती निराश आहे. तिने सांगितले की तिला निसर्गापासून वेगळे करण्यास पोलीस कारणीभूत आहेत,” असे श्रीधर म्हणाले.
श्रीधर म्हणाले की कुटीनाने या काळात तिच्या मुलांची चांगली काळजी घेतली आहे. “तिच्या मोबाईल फोनमध्ये असे अनेक फोटो आहेत जिथे मुले आनंदाने पोज देताना दिसतात. तिने मुलांसाठी एक वेळापत्रक आखले होते ज्यामध्ये चित्रकला, गायण, मंत्र पठण, योग आणि इतर व्यायामाचा समावेश होती. इतकेच नाही तर रविवारी सकाळीही ती तिच्या मुलांना योग शिकवत होती,” असे श्रीधर यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की त्यांना तिचा टाकून दिलेला पासपोर्ट गुहेच्या जवळ सापडला आणि त्यांनी फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (एफआरआरओ) शी संपर्क साधला. या संस्थेकडून देशात आलेल्या परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची नोंदणी, देखरेख आणि व्यवस्थापण केले जाते.
दोन मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने जंगलात ८ वर्षे कशी घालवली? चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती
