लांजा : गोंडेसखल येथील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने शहरातील गोंडेसखल रोडवर बेशिस्त वाहने पार्किंग करणाऱ्यांवर लांजा पोलिसांच्यावतीने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून गोंडेसखल रस्त्यावर “नो पार्किंग” चा फलक लावण्यात आला आहे.
लांजा-गोंडेसखल रस्ता हा शहरातील नेहमीचा वर्दळीचा असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात. यामुळे वाहतूकीस वारंवार अडथळा होत असतो. बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमक उडत असल्याने गोंडेसखलला जाणारी एसटी बस बंद करावी अशी मागणी लांजा आगारातील वाहकांकडून करण्यात आली होती. या संदर्भातील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.
त्यामुळे गोंडेसखल येथील ग्रामस्थांनी लांजा पोलीस ठाणे येथे धाव घेत बस बंद झाली तर ग्रामस्थांची आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमणात अडचण होईल त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी असे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर लांजा पोलीस ठाण्याच्यावतीने तत्काळ गोंडेसखल रोडवर जाऊन बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी गोंडेसखलचे ग्रामस्थ देखील उपस्थित होते.
दरम्यान, बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्यानंतर गोंडेसखल रस्त्यावर अखेर “नो पार्किंग” चा फलक लावण्यात आला आहे. तसेच बेशिस्तपणे वाहने पार्किंग करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरू राहील असे लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सांगितले.
लांजातील गोंडेसखल रस्त्यावर ‘नो पार्किंग’ बोर्ड; बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
