अनेकांना शॉक बसल्याची
रत्नागिरी: रत्नागिरी शहर आणि तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून, विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील करबुडे आणि शितपवाडी, बौद्धवाडी या दोन वाड्यांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरवत, मोसमी पावसाने परतीची वाट धरली असताना हा अवकाळी पाऊस झाला. ढगांच्या गडगडटात, विजांच्या कडकडाटात पावसाची सुरुवात झाली आणि त्यासोबत वेगवान वारेही वाहिले, ज्यामुळे अनके ठिकाणी मोठी पडझड झाली.
या वादळी पावसामुळे करबुडे धनावडे वाडी येथील शेतकरी रमेश देमा धनावडे यांचे दोन बैल वीज पडून मरण पावले आहेत. जनावरांच्या झालेल्या या नुकसानीने शेतकरी धनावडे यांना मोठा धक्का बसला आहे. याशिवाय करबुडे, शितपवाडी आणि बौद्धवाडी येथे विजा आणि वादळी वाऱ्यामुळे एकूण १४ ते १५ घरे, गोठे, शाळा आणि सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत लाखोंची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वादळी पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रभाकर केरू जाधव, मिलिंद भागुराम जाधव, शैला अशोक जाधव, प्रकाश सिताराम जाधव, प्राची बबन जाधव, दीपक गोविंद पाष्टे, सुरेश रामचंद्र पास्ट आणि गणपत पांडुरंग पाष्टे यांच्या घरांचे पत्रे आणि कौले उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, शंकर केरू जाधव आणि राकेश जाधव यांच्या गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले असून, लखमा गोपाळ पाचकुडे यांच्या चिकन शॉपलाही वादळाचा फटका बसला आहे.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये सार्वजनिक संस्थांचीही मोठी हानी झाली आहे. गावातील बुद्ध विहाराला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. एक नंबर शाळेची कंपाउंड वॉल (भिंत) आणि शौचालयाच्या इमारतीचे नुकसान झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि करबुडे हायस्कूलचेही मोठे नुकसान झाले आहे. रामगडेवाडी शाळेच्या कौले आणि खिडक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे रत्नागिरी तालुक्यात, विशेषतः या वाड्यांमध्ये, मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.