GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना; भटक्या कुत्र्याचे डोळे फोडून, पाय तोडत अमानुष छळ, अज्ञात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
345 Views

रत्नागिरी: शहरातील पेठकिल्ला रोडवर एका निष्पाप भटक्या कुत्र्याचा अत्यंत अमानुष आणि क्रूरपणे छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने या मुक्या प्राण्याचे दोन्ही डोळे फोडून, डोक्यावर टोकदार वस्तूने वार करत त्याचा पाय तोडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात इशान प्रसाद खानोलकर (वय २२, रा. निवास क्रमांक ३२२३/बी, दत्तगिरी, कित्ते भंडारी हॉलच्या मागे, बंदर रोड, रत्नागिरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ६ जून २०२६ रोजी संध्याकाळी १७:३० ते ७ जून २०२६ रोजी सकाळी १०:०९ वाजण्याच्या दरम्यान पेठकिल्ला रोडवरील पाथरे बागेच्या बाजूला असलेल्या नाईक कंपनीसमोर हा क्रूरतेचा कळस घडला. कोणातरी अज्ञात नराधमाने एका भटक्या कुत्र्याचे दोन्ही डोळे फोडले, ज्यामुळे त्याचा एक डोळा थेट बाहेर आला होता. एवढ्या खापरपणावरच न थांबता त्या व्यक्तीने कुत्र्याच्या डोक्याच्या वरील भागात कोणत्यातरी टोकदार वस्तूने गंभीर वार केले, त्याचे दोन्ही मागचे पाय एकत्र बांधले आणि मागचा डावा पाय तोडून टाकला. या अत्यंत वेदनादायी आणि गंभीर दुखापतीमुळे तो मुका प्राणी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

हा क्रूर प्रकार समोर आल्यानंतर ७ जून २०२६ रोजी  रत्नागिरी शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी  भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(A) आणि ११(१)(I) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे रत्नागिरीतील प्राणिप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, या विकृत प्रवृत्तीच्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3480054
Share This Article