GRAMIN SEARCH BANNER

५ रुपयांच्या नोटेसाठी सव्वा नऊ लाखांचा गंडा; रत्नागिरीतील वृद्धाची फसवणूक

Gramin Varta
151 Views

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील भाट्ये-मिऱ्या परिसरातील एका ७१ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला जुन्या ५ रुपयांच्या नोटेच्या बदल्यात १५ लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख २१ हजार ७०१ रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील अमित चव्हाण नावाच्या व्यक्तीवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत ही फसवणूक झाली. फिर्यादी हेमंत मारुती शिवलकर यांनी फेसबुक रिल्सवर एक जाहिरात पाहिली होती, ज्यामध्ये ५ रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चिन्ह असल्यास १५ लाख रुपये मिळतील असे सांगण्यात आले होते. या जाहिरातीच्या माध्यमातून आरोपी अमित चव्हाण याने शिवलकर यांच्याशी संपर्क साधला. नोटेच्या बदल्यात मोठी रक्कम मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने शिवलकर यांना विविध बँक खात्यांमध्ये आणि गुगल पे च्या माध्यमातून पैसे भरण्यास भाग पाडले. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने फिर्यादींकडून एकूण ९,२१,७०१ रुपये उकळण्यात आले.

केवळ आर्थिक लूट करून आरोपी थांबला नाही, तर त्याने फिर्यादीच्या बँक खात्यांचा वापर करून इतर लोकांचीही फसवणूक केली. इतर लोकांकडून फसवणुकीची रक्कम शिवलकर यांच्या खात्यात जमा करून ती नंतर काढून घेत आरोपीने त्यांची दिशाभूल केली. फिर्यादी हे वयोवृद्ध असल्याने आणि ते नियमितपणे बँकेत जात नसल्यामुळे हा प्रकार बराच काळ त्यांच्या लक्षात आला नाही. मात्र, बँकेकडून सविस्तर माहिती घेतल्यानंतर आपल्याला मोठ्या रक्कमेचा गंडा घातला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:२९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३१८(४) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3292224
Share This Article