GRAMIN SEARCH BANNER

परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Gramin Varta
38 Views

मुंबई: येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे.

मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे, म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणे, हा नियम आधीपासूनच लागू आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.

मंत्री सरनाईक म्हणाले की, ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक आहे, तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे असल्याचेही ते म्हाणाले.

म्हणूनच १ मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता येणे व वाचता येणे बंधनकारक राहील. नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे.

Total Visitor Counter

3291845
Share This Article