GRAMIN SEARCH BANNER

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करण्याबाबत हालचालींना वेग; रेल्वेमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर प्रवाशांच्या आशा पल्लवीत

मुंबई: कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडीबाबत पुन्हा एकदा सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या दिवा स्थानकावरून सुटणारी ही गाडी पूर्वीप्रमाणे दादरहूनच चालवावी, या प्रवाशांच्या आग्रही मागणीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भात आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले असले, तरी ठोस निर्णयाअभावी प्रवाशांमध्ये अद्यापही काही प्रमाणात नाराजी कायम आहे.

मध्य आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांकडून या गाडीसाठी दीर्घकाळापासून पाठपुरावा केला जात आहे. सध्या ही गाडी दिवा टर्मिनलवरून सुटत असल्याने मुंबईतील प्रवाशांना तेथपर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे ही गाडी पुन्हा दादरहून सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य नसल्याचे मत विविध प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे. अन्य मार्गांवरील गाड्यांसाठी मुंबईतील महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मची उपलब्धता होत असताना, कोकणच्या गाड्यांना मुंबईबाहेरून का चालवले जाते, असा प्रश्न उपस्थित करून कोकण विकास समितीचे जयवंत दरेकर यांनी प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधले आहे. केवळ आश्वासनांवर विषय न रेंगाळता प्रशासनाने आता तातडीने कार्यवाही करावी, अशी भावना कोकणवासीयांकडून व्यक्त होत आहे. जर इतर गाड्यांना दादर किंवा सीएसएमटी येथे स्थान मिळू शकते, तर कोकणातील प्रवाशांच्या संयमाची परीक्षा रेल्वे प्रशासनाने घेऊ नये, अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Total Visitor Counter

3438048
Share This Article