रत्नागिरी: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध शस्त्रांविरोधात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी जिल्ह्यात मोठी कारवाई करत अवैध शस्त्रांचे तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान पोलीस पथकांनी विविध ठिकाणी प्रभावी माहिती संकलन आणि छापेमारी करत एकूण आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम, १९५९ (आर्म्स ऍक्ट) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या यशस्वी कारवायांमध्ये आरोपींकडून एकूण ७ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये ५ सिंगल बॅरल काडतुसी बंदुका, १ ठासणीची बंदूक आणि १ लोखंडी गावठी कट्ट्याचा समावेश आहे. शस्त्रांशिवाय पोलिसांनी २९ जिवंत काडतुसेही जप्त केली असून, या कारवाईमुळे भविष्यात घडणारे संभाव्य गंभीर गुन्हे रोखण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या संपूर्ण कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण २,२८,३३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध शस्त्रे आणि जिवंत काडतुसांचा एवढा मोठा साठा जप्त केल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत अवैध शस्त्र बाळगणे, त्यांची विक्री करणे किंवा वापर करणे याविरोधात अत्यंत कठोर धोरण अवलंबले जात आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा, छापेमारी आणि प्रतिबंधात्मक कारवाया अधिक तीव्र आणि प्रभावीपणे राबविल्या जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दिला आहे.





