GRAMIN SEARCH BANNER

गोवा बनावटीचा दारूसाठा लांजात पोहोचतोच कसा; राज्य उत्पादन शुल्क विभाग थंडावलेय का? सर्वसामान्यांना प्रश्न

Gramin Varta
112 Views

लांजा: तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात आवक आणि बेकायदेशीर विक्री होत असल्याचे चित्र समोर येत आहे. लांजा पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त केला असून, हा दारूसाठा तालुक्यात नेमका पोहोचतो तरी कसा, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

लांजा पोलिसांनी कोंडगे, सापुचेतळे, खानवली आदी भागांत अलीकडील काळात केलेल्या दारुविरोधी कारवायांमध्ये विनापरवाना व बेकायदेशीररीत्या दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींकडून गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. मात्र हा दारूसाठा तालुक्यात आणला जातो कसा आणि त्यामागे कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचे उत्तर अद्यापही अनुत्तरित आहे.

तालुक्यातील दुर्गम खेड्यापाड्यांपर्यंत गोवा बनावटीची दारू सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोव्यातून स्वस्त दरात उपलब्ध होणारी ही दारू तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, गोवा बनावटीच्या दारूची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई मात्र अपेक्षित प्रमाणात होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई थंडावली आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

स्वस्त दरात मिळणाऱ्या या दारूमुळे अनेक तरुण व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असून त्याचा सामाजिक परिणामही दिसून येत आहे. अनेक कुटुंबांमध्ये वाद-विवाद, भांडणतंटे वाढल्याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे या अवैध दारू विक्रीच्या साखळीचा शोध घेऊन गोवा बनावटीच्या दारूच्या विक्रीची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे.

Total Visitor Counter

3437944
Share This Article