GRAMIN SEARCH BANNER

पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उक्षी येथे विविध उपक्रमांचे आयोजन

Gramin Varta
297 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उक्षी गावात विविध समाजउपयोगी आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना विभाग संघटक मिलिंद खानविलकर यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली दिनांक २६ डिसेंबर रोजी दिवसभर हे कार्यक्रम पार पडणार आहेत. केवळ जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपत नामदार सामंत यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय स्थानिक शिवसैनिकांनी घेतला असून, या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस हा रत्नागिरीतील शिवसैनिकांसाठी एका उत्सवाप्रमाणे असतो. याच पार्श्वभूमीवर उक्षी गावामध्ये या दिवशी सकाळपासूनच भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसाची सुरुवात धार्मिक विधींनी होणार असून, गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात उदय सामंत यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी साकडे घालण्यात येणार आहे. यावेळी मंदिरात विशेष महाअभिषेक आणि पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

धार्मिक कार्यक्रमांसोबतच शैक्षणिक आणि बौद्धिक उपक्रमांवर या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष भर देण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना लोकप्रतिनिधींच्या कार्याची ओळख व्हावी, या हेतूने एका विशेष वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘उदय सामंत यांचे कार्य आणि कर्तृत्व’ हा या स्पर्धेचा विषय असून, या माध्यमातून विद्यार्थी सामंत यांच्या रत्नागिरीतील विकासकामांचा आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा आपल्या भाषणातून घेणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव ठरणार आहे.

तसेच, लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात येणार आहे. मिलिंद खानविलकर यांच्या तर्फे आयोजित या कार्यक्रमांमुळे उक्षी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढदिवसानिमित्त फ्लेक्सबाजी किंवा फटाक्यांची आतषबाजी करण्यापेक्षा, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवल्याबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यक्रमाला सरपंच किरण जाधव, माजी उपसरपंच मंगेश नागवेकर, माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, ग्रामपंचायत सदस्य जुनेद खान ,उक्षी परिसरातील शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Total Visitor Counter

3073151
Share This Article