चिपळूण : कात्रोळी–लायकवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री बिबट्याचे एक पिल्लू थेट घराच्या कोंबडीच्या लोखंडी खुराड्यात शिरल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. आत गेल्यानंतर पिल्लू लोखंडी रचनेत अडकून पडल्याने बाहेर येऊ शकत नव्हते. अखेर वनविभागाला दिलेल्या तात्काळ कळविण्यामुळे रात्री दोन वाजता दाखल झालेल्या पथकाने हे पिल्लू सुरक्षित बाहेर काढले.
सुरेश जाधव यांच्या कोंबडीच्या खुराड्याच्या तळाशी असलेल्या फाटलेल्या पत्र्याच्या जागेतून हे पिल्लू आत गेले. अचानक कोंबड्यांचा कल्लोळ झाल्याने जाधव जागे झाले. लाईट लावताच खुराड्यात बिबट्याचे पिल्लू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सरपंच दीपक निवळकर यांना खबर दिली. निवळकर यांनी तात्काळ चिपळूण परिक्षेत्राचे वन अधिकारी सरवर खान यांच्याशी संपर्क साधला.
खान हे आधुनिक पिंजरा आणि पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सोबत वनपाल दयानंद सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले व वाहनचालक नंदकुमार कदम होते. घटनास्थळी ग्रामस्थांचीही गर्दी झाली होती.
खुराड्याची जागा अरुंद आणि घराच्या अगदी चिकट असल्याने पिंजरा बसवणे कठीण होते. थेट जेरबंद करण्याचा प्रयत्न अत्यंत जोखमीचा ठरू शकत असल्याने बाव पथकाने पर्यायी मार्ग निवडला. खुराड्याच्या तळाशी लाकडी फळ्या लावून त्या लोखंडी ग्रीलने घट्ट बांधण्यात आल्या. ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण खुराडा उचलून मोकळ्या जागी ठेवण्यात आला.
त्यानंतर खुराड्याजवळ पिंजरा लावून ग्राईंडरच्या सहाय्याने खुराड्याचे दार सावधपणे तोडण्यात आले. मात्र पिल्लू लगेच पिंजऱ्यात जात नव्हते. जवळजवळ तासभराच्या प्रयत्नानंतर शेवटी बिबट्याचे पिल्लू पिंजऱ्यात शिरले आणि वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर कणसे यांनी तपासणी केली असता पिल्लू पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
चिपळूण : कोंबडीच्या खुराड्यात अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका






