GRAMIN SEARCH BANNER

सरन्यायाधीशांवर जोडा फेकण्याचा प्रयत्न, वकील राकेश किशोर निलंबित

Gramin Varta
23 Views

दिल्ली: सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर जोडा फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याला बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) ने तात्काळ निलंबित केलं आहे.

निलंबनाच्या काळात त्यांना कोणत्याही न्यायालय, ट्रिब्युनल किंवा अधिकरणात हजर राहण्याची, वकिली करण्याची किंवा केस चालवण्याची परवानगी दिली जाणार नाही.

बीसीआय ने राकेश किशोर यांचा वकिलीचा परवाना रद्द केला असून, या प्रकरणी अनुशासनात्मक कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यांना १५ दिवसांत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांनी ही कारवाई का सुरू ठेवू नये हे स्पष्ट करावं लागेल. त्यांच्या उत्तरानंतर आणि तपासाच्या आधारावर कौन्सिल योग्य तो निर्णय घेईल.

दुसरीकडे, सीजेआय बी. आर. गवई यांनी स्वतः राकेश किशोरविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ सूत्रांनुसार,सीजेआय यांनी रजिस्ट्री अधिकाऱ्यांना सांगितले की, या घटनेकडे उपेक्षेने पाहावं आणि दुर्लक्षित करावं.जेवणाच्या सुट्टीत, सीजेआय न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल, सुरक्षा प्रमुख व इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सतर्कता वाढवण्यावर चर्चा केली.

वकील राकेश किशोर याने सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या दिशेने जोडा फेकण्याचा प्रयत्न केला आणि जोरात ओरडला, “भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही!” त्याला तत्काळ कोर्ट परिसरात ताब्यात घेण्यात आलं. मात्र काही वेळातच दिल्ली पोलिसांनी त्याची कोर्टातच सुटका केली. हा जोडा न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्याकडे गेला पण त्यांना लागला नाही. नंतर किशोरने कबूल केलं की, हा हल्ला सीजेआय गवई यांच्यावरच होता, आणि न्यायमूर्ती चंद्रन यांची माफीही मागितली.

Total Visitor Counter

2651782
Share This Article