GRAMIN SEARCH BANNER

ओझरखोल येथे एस.टी. व मिनीबसची जोरदार धडक – मिनीबस चालक गंभीर, अनेक प्रवासी जखमी

मकरंद सुर्वे : संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गावर ओझरखोल (ता. संगमेश्वर) येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एस.टी. बस ( एम एच 20 बी एल 4038) व मिनीबस (एम एच 08 एपी4527)यांच्यात भीषण अपघात झाला. या धडकेत मिनीबसचा चालक गंभीर जखमी झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. रत्नागिरीहून चिपळूणकडे जाणारी एस.टी. बस आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी मिनीबस यांच्यात ही समोरासमोर धडक झाली. हा अपघात 5 वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघात इतका भीषण होता की मिनीबसचा पुढील भाग अक्षरशः चिरडला गेला. चालक जवळपास अर्धा तास गाडीत अडकलेला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक, पोलीस आणि अपात्कालीन सेवांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर क्रेनच्या सहाय्याने चालकाला बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर तत्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामचंद्र फेपडे ( 60), रघुनाथ दत्तात्रय पाठक, राजू चोचे ( 60,संगमेश्वर) अशी जखमींची नावे आहेत.

एस.टी. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मिनी बसमधील अडकलेल्या चालकाला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहतूक पोलीस तपास करत आहेत. या भागात वारंवार होणारे अपघात पाहता प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

2455621
Share This Article