संगमेश्वर : कोकणातील अग्रगण्य चित्र–शिल्प कलामहाविद्यालय, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे (संलग्न – महाराष्ट्र राज्य कला संचालनालय व महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई) हे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कलानुभवासाठी पावसाळी शैक्षणिक सहलीचे आयोजन करत असते. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी थेट साक्षात्कार घडतो आणि कलेचा मूळ गाभा अनुभवता येतो.यंदाची मान्सून सहल २०२५ देवरुख परिसरातील पित्रे चित्र संग्रहालय, डी कॅड कॉलेज, पालकर फाउंडेशन- विघ्रवली आणि ओली माती पॉटरी वर्कशॉप या ठिकाणी पार पडली.
सहलची सुरुवात पित्रे चित्र संग्रहालयाला भेट देऊन झाली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कोकणातील चित्रसंस्कृतीचा इतिहास, पारंपरिक तैलचित्रे आणि स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींचा अभ्यास केला. संग्रहालयातील निसर्गचित्रे आणि लोकजीवनावर आधारित कलाकृतींनी विद्यार्थ्यांना नव्या दृष्टीकोनाची ओळख करून दिली. या अनुभवावर आधारित अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर निसर्गचित्रे रेखाटली. यानंतर डीकॅड कॉलेज ला भेट देऊन विद्यार्थ्यांनी आधुनिक कला शिक्षणातील पद्धती, माध्यमांचा वापर आणि संकल्पनाधारित कलेचे बारकावे जाणून घेतले.
यानंतर विद्यार्थ्यांनी पालकर फाउंडेशन, विघ्रवली येथे दुपारनंतर निसर्गचित्र निर्मिती केली. पावसाळी वातावरण, हिरवीगार झाडी, आणि ओलसर माती यांच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांनी जलरंग, तैलरंग, पेन्सिल, खडू अशा विविध माध्यमांतून कोकणाचा निसर्ग आपल्या कॅनव्हासवर उमटवला. प्रा. विक्रम परांजपे यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्र प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनी रंगसंगती, रचना व निसर्गातील प्रकाशछटा कशा टिपाव्यात याचे मार्गदर्शन दिले.
सहलच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी ओली माती पॉटरी वर्कशॉप येथे सहभाग घेतला. मातीपासून आकारनिर्मिती, टेक्स्चरिंग आणि बर्निशिंगच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांनी शिल्पकलेचे बारकावे आत्मसात केले. मातीशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवीन प्रेरणा मिळाली.
या संपूर्ण सहलीत सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टचे चेअरमन तसेच कोकणचे जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य प्रा. माणिक यादव, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कलात्मक मार्गदर्शन केले.
या मान्सून सहलीत विद्यार्थ्यांनी साकारलेली चित्रे आणि शिल्पे सह्याद्रि कलादालन, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत.
चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. उद्घाटक म्हणून सौ. प्रज्ञा मिलिंद जोगळेकर (प्रमुख सल्लागार, ग्रामकौशल फाउंडेशन, चिपळूण) उपस्थित होत्या तसेच अध्यक्षस्थान
प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के (चेअरमन, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे) यांनी भूषविले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून गत वर्षी मूलभूत अभ्यासक्रम विभागात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या आणि सलग तीन वर्ष याच महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास सौ. प्रज्ञा मिलिंद जोगळेकर (प्रमुख सल्लागार, ग्रामकौशल फाउंडेशन, चिपळूण) यांच्यातर्फे शिष्यवृत्ती देण्यात आली हि शिष्यवृत्ती कुमारी. ज्योती पांचाळ शिल्पकला विभाग तसेच कु. आर्यन हरेकर पेंटिंग विभाग यांना प्रदान करण्यात आली.
या कलाप्रदर्शनात मांडलेल्या चित्र शिल्पांना पारितोषिक देण्यात आली.या प्रदर्शनात मांडलेल्या चित्र शिल्पांचे परीक्षण चित्रकार प्रविण मिसाळ यांनी केले.यातून उत्कृष्ट सात व विशेष पाच पारितोषिक काढण्यात आली.उत्कृष्ट कलाकृती पारितोषिक – नवाज हमदुले, शुभम लिबे, संकेत गोरीवले, प्रथमेश गोंधळी, प्रज्वल घडशी, पंकज सुतार, कृतिका खामकर विशेष पारितोषिक- रुद्र शिगवण, धनंजय नलावडे, भाग्यश्री पाथरवट, ओम बामगुडे मिथिल, आंगगचेकरयांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. शेखर निकम व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी मा.महेश महाडिक,सौ. पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
तसेच या प्रदर्शनात प्रदर्शित होणाऱ्या चित्रांची लिलावस्वरूपात विक्री होणार आहे.हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य दि.१४ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत खुले राहणार आहे.तरी सर्व कलाप्रेमी, कलारसिक यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी केले आहे.
सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट च्या पावसाळी चित्र शिल्प कलाप्रदर्शनास प्रारंभ
