GRAMIN SEARCH BANNER

जिल्हा अग्रणी बँक ‘बँक ऑफ इंडिया’ तर्फे कोतवडे येथे आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत शिबिर

Gramin Varta
84 Views

रत्नागिरी– वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तिपर्यंत शासन योजनांचा लाभ पोहचावा, या उद्देशाने दि. १ जुलै ते ३१ आॕक्टोबर या चार महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने, बँक ऑफ इंडिया (रत्नागिरी जिल्ह्याची अग्रणी बँक) तर्फे कोतवडे ग्रामपंचायत हद्दितील परिवर्तन हॉल येथे आर्थिक समावेशन योजनांबाबत तसेच री-केवायसी जनजागृती मोहिमेअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला भारतीय रिझर्व्ह बँकेचे उप महाप्रबंधक एच एस वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी री-केवायसी का आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले तसेच डिजिटल फसवणूक टाळण्याचे उपाय आणि “डिजिटल अरेस्ट” या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती केली. त्याप्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रबंधक बेनज़िर शेख यांनी री-केवायसी आणि निष्क्रिय ठेव मोहिमेबाबत जनजागरुकता केली.

बँक ऑफ इंडियाचे उपआंचलिक प्रबंधक अंजनी कुमार सिंह आज़ाद यांनी प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY) तसेच निष्क्रिय ठेवी (Unclaimed Deposits) टाळण्यासाठी REKYC आणि खात्याला वारस (Nomination) असणे का आवश्यक आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी एकूण चार लाख रकमेचे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यास बँक ऑफ इंडियाद्वारे रु. २ लाखांचे दोन दावा धनादेश प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेचे उप महाप्रबंधक एच एस वर्मा यांनी सर्व उपस्थिताना प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन केले.

सोबतच या कार्यक्रमात अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, बँक ऑफ इंडिया कोतवडे शाखा व्यवस्थापक हरजीत सिंग गिल, रत्नागिरी तालुका अभियान व्यवस्थापक साक्षी वायंगनकर, कोतवडे सरपंच संतोष बारगोडे आणि ग्रामविकास अधिकारी देविदास इंगळे आदी उपस्थित होते.

या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 200 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी सर्व बँकांच्या बँक प्रतिनिधींनी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते उघडणीसह PMJJBY, PMSBY व APY योजनांमध्ये नावनोंदणी केली. या शिबिराचे यशस्वी आयोजन विजय पाटील, प्रबंधक (वित्तीय समावेशन) आणि त्यांच्या बँक ऑफ इंडिया टीमने केले. तसेच सदारच्या शिबिराकारिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सोबतच या कार्यक्रमात उप अंचल प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र, उप क्षेत्रीय व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक, सरव्यवस्थापक आरडीसीसी, भारतीय स्टेट बँकचे मुख्यप्रबंधक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरामुळे स्थानिक लोकांना विविध वित्तीय योजना आणि सेवा समजून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक (वित्तीय समावेशन) विजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी केले.

Total Visitor Counter

3369368
Share This Article