GRAMIN SEARCH BANNER

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! एलपीजी गॅस सिलेंडर झाला स्वस्त

Gramin Varta
540 Views

मुंबई: डिसेंबर महिन्याची सुरुवात सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी घेऊन आली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या नव्या किमती जाहीर करत असतात.

दर महिन्याला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीचे रिविजन होते.

यानुसार या वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत अर्थात 19 किलो वजने गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे.

सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी (IOC, BPCL, HPCL) एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतल्यानंतर डिसेंबर महिन्यासाठी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले आहेत.

यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. पण डिसेंबर मध्ये सुद्धा 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अर्थात या दर कपातीचा सर्वसामान्यांना थेट फायदा होणार नाही पण तरीही अप्रत्यक्षरीत्या सर्वसामान्यांचे पैसे वाचणार आहेत.

या निर्णयामुळे हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार, आज 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

महत्वाची बाब म्हणजे हे रेट आजपासून अर्थात एक डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. या कपातीमुळे राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1590.50 रुपयांवरून 1580.50 रुपयांवर आली आहे.

गेल्या काही महिन्यांत व्यावसायिक गॅसच्या किमती सातत्याने कमी होत आहेत. यावर्षी व्यावसायिक गॅसच्या किमतीत सतत बदल झाला आहे. नोव्हेंबरमध्ये 19 किलो सिलेंडरची किंमत 5 रुपये कमी झाली होती.

पण ऑक्टोबरमध्ये यात 15.50 रुपयांची वाढ नोंदली गेली होती. त्याआधी सलग दोन ते तीन महिने दर घटले होते. घरगुती 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल नाही.

दिल्लीमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत अद्याप 853 रुपये इतकीच आहे. देशभरातील घरगुती गॅसच्या दरांमध्ये एप्रिलनंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मुंबई-पुण्यातील दर कसे आहेत?

मुंबई आणि पुणे येथे 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत 1531.50 रुपये झाली आहे. तसेच कोलकातामध्ये 1684 रुपये आणि चेन्नईमध्ये 1739.50 रुपये आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल नसल्यामुळे ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच दर मोजावे लागतील. सध्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत 852.50 रुपये, दिल्लीमध्ये 853 रुपये, कोलकातामध्ये 879 रुपये आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपये इतकी आहे.

Total Visitor Counter

3206106
Share This Article