मंडणगड : तालुक्यातील लाटवण फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला अज्ञात दुचाकीस्वाराने जोराची धडक देऊन अपघात केल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, अपघात घडल्यानंतर चालक घटनास्थळावरून दुचाकीसह पसार झाला आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता अनंत कदम (वय ६०, रा. लाटवण) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी, १६ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अनिता कदम या आपल्या मुलीसह बँकेतून पैसे काढण्यासाठी निघाल्या होत्या. लाटवण फाटा येथे रस्ता ओलांडत असताना एका भरधाव अज्ञात दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अनिता कदम रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर संबंधित दुचाकीस्वाराने जखमी महिलेला मदत करण्याऐवजी तिथून पळ काढला.
जखमी अवस्थेत अनिता कदम यांना तातडीने मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरा मंडणगड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १३४ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सध्या या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने फरार दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.






