लांजा: लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर एकलुरे हॉस्पिटलसमोर गुरुवारी, ४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता एका दुर्दैवी अपघातात ७० वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाले. मुंबई-गोवा महामार्गावरुन पायी चालत जात असताना एका भरधाव मोटरसायकलने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव सदानंद कृष्णा कांबळे (वय ७०, रा. आडवली, हसोळ बौद्धवाडी, ता. लांजा) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना समोरून वेगात आलेल्या मोटरसायकल (क्रमांक एमएच ०८ यू ७९७६) ने त्यांना धडक दिली. ही मोटरसायकल रवींद्र शरद शिंदे (वय ३९, रा. वेरळ, मधलीवाडी, ता. लांजा) चालवत होता.
या धडकेमुळे सदानंद कांबळे हे रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ उपचारासाठी लांजा येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
या अपघातामुळे महामार्गावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.