ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कुवेसकर यांची गटविकास अधिकाऱ्याकडे धाव
राजापूर : तालुक्यातील दळे ग्रामपंचायतीत काम करणारे दीर्घ सेवेत असलेले कर्मचारी संतोष शंकर कुवेसकर यांनी सरपंच महेश करगुटकर यांच्यावर वैयक्तिक रागातून सेवेतून बडतर्फ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी पंचायत समिती राजापूरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे सविस्तर लेखी निवेदन दाखल करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
३५ वर्षांची सेवा असूनही बडतर्फी
कुवेसकर हे दिनांक १ जून १९९० पासून ग्रामपंचायत दळे येथे कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली असूनही, २२ सप्टेंबर २०२५ रोजी सरपंचांनी अचानक आदेश काढून त्यांना सेवेतून कमी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“मी आजपर्यंत इमानेइतबारे सेवा बजावत आलो आहे. परंतु बडतर्फीमुळे माझी परिस्थिती गंभीर झाली आहे. मला कुणाकडूनही आर्थिक आधार नाही. पत्नी सतत आजारी असून दोन मुलांचे शिक्षण सुरू आहे. माझ्या सेवेतून मिळणाऱ्या पगारावरच संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. आता मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न उभा राहिला आहे,” असे कुवेसकर यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
कुवेसकर यांनी असा दावा केला आहे की, सरपंच करगुटकर हे वैयक्तिक आकस ठेवून त्यांना वारंवार लोकांसमोर अपमानित करत असत. “माझी आर्थिक परिस्थिती चांगली नसताना मला मुद्दाम लक्ष्य केले जाते. सरपंचांच्या अन्यायकारक निर्णयामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे,” असा आरोप त्यांनी केला.
ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कुवेसकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विनंती करताना म्हटले आहे की, “माझ्यावरील बडतर्फीचा निर्णय चुकीचा आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून मला पुन्हा सेवेत घेण्यात यावे व न्याय मिळवून द्यावा.”
या संपूर्ण प्रकरणामुळे दळे ग्रामपंचायतीत व परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दीर्घकाळ सेवा केलेल्या कर्मचाऱ्याला अचानक बडतर्फ केल्याने ग्रामपंचायतीतील कारभारावर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. आता गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी व पुढील निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ केल्याचा दळे सरपंचावर आरोप
