चिपळूण: आजारपणाला कंटाळून असुर्डे येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read
suicide concept. noose with shadow on dark wall background

चिपळूण: तालुक्यातील असुर्डे साळवीवाडी येथील एका ४९ वर्षीय महिलेने दीर्घकाळ सुरू असलेल्या आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शर्वरी संतोष साळवी असे या मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शर्वरी साळवी या गेल्या काही काळापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर डॉक्टरांकडून नियमित औषधोपचारही सुरू होते, मात्र आजारपणामुळे त्या मोठ्या मानसिक तणावाखाली होत्या. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नसताना त्यांनी आपल्या बेडरुममधील लोखंडी चॅनलला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. घरच्यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात १ एप्रिल रोजी सायंकाळी ५:०८ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजाराच्या असह्य वेदना आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सावर्डे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. एक सुशिक्षित आणि शांत स्वभावाच्या महिलेने अशा प्रकारे आपले जीवन संपवल्याने साळवीवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *