GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : राजनगर येथे विनापरवाना भरधाव दुचाकीस्वाराने तरुणीला उडवले

Gramin Varta
125 Views

रत्नागिरी: शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावर राजनगर येथील बँक ऑफ इंडिया एटीएम समोर एका भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या तरुणीच्या गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात १९ वर्षीय तरुणी जखमी झाली असून, विनापरवाना आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका ३२ वर्षीय तरुणावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. फिर्यादी पोलीस हवालदार शरद बाबल्या कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रथमेश सोगम (वय ३२, रा. विनम्रनगर, गोडाऊन स्टॉप, रत्नागिरी) हा आपली होंडा ट्विस्टर दुचाकी (क्रमांक एमएच-०९-बीआर-७२५०) घेऊन कोकणनगरकडून चर्मालयच्या दिशेने जात होता. यावेळी राजनगर येथे त्याने आपली दुचाकी अत्यंत भरधाव आणि धोकादायक स्थितीत चालवत रस्ता ओलांडून चुकीच्या बाजूला नेली. याच वेळी समोरून येणाऱ्या टीव्हीएस ज्युपिटर गाडीला (क्रमांक एमएच-०८-बीएच-२२८६) त्याने जोरदार धडक दिली. या धडकेत ज्युपिटर चालक रक्षा राजेश पनसकर (वय १९, रा. कोकणनगर) ही तरुणी जखमी झाली असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे, अपघातग्रस्त होंडा ट्विस्टर चालवणाऱ्या प्रथमेश सोगम याच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. तसेच त्याच्या दुचाकीला पुढील व मागील बाजूला नंबर प्लेट नव्हती आणि गाडीचा विमादेखील उतरवलेला नव्हता. या बेजबाबदारपणामुळे झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत पोलिसांनी १ एप्रिल २०२६ रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१ तसेच मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करत असून रस्त्यांवरील अशा बेदरकार वाहन चालकांमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

3246263
Share This Article