GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरमध्ये केमिकल टँकरला भीषण आग

राजापूर : तालुक्यातील पन्हाळे माळवाडी परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून केमिकल घेऊन जाणाऱ्या एका टँकरला आज सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

टँकर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना, पन्हाळे माळवाडी हद्दीत अचानक मागच्या चाकांनी पेट घेतला. काही क्षणांत संपूर्ण टँकर आगीत जळून खाक झाला. आग एवढी भीषण होती की, परिसरात मोठा धुराचे लोट पसरले होते. बघता बघता अर्धा टँकर जळून खाक झाला. हे पाहिल्यानंतर टँकर चालकाने गाडीतून उडी घेत मदतीसाठी याचना केली.

या घटनेनंतर महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक स्थानिक नागरिकांनी तत्काळ थांबवली. मात्र, आगीची माहिती मिळूनही घटनास्थळी आपत्कालीन यंत्रणा वेळेत पोहोचू शकल्या नाहीत, यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अपघातग्रस्त टँकरमध्ये कोणत्या प्रकारचा केमिकल होता, याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. तथापि, संभाव्य स्फोट किंवा गळती होण्याचा धोका लक्षात घेता, नागरिकांनी प्रसंगावधान राखून इतरांना घटनास्थळी जाण्यापासून अडवले.

स्थानिक प्रशासन, अग्निशमन विभाग आणि पोलीस यंत्रणा अजूनही घटनास्थळी पोहोचण्याची प्रतीक्षा सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Total Visitor Counter

2456000
Share This Article